पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
यातला पहिला बदल म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
तर दुसरा बदल म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार कार्डाशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
अन्यथा इथून पुढचे म्हणजे एप्रिल महिन्यापासून पुढचे हप्ते संबंधित शेतकऱ्याला मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकतो
ई-केवायसी कसं करायचं?
eKYC म्हणजेच Electronic Know your Client. या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.
याआधी आधार कार्ड ज्या मोबाईल फोनला लिंक केलेला आहे, त्यावर ओटीपी पाठवून शेतकरी स्वत: ई-केवायसी करू शकत होते.
पण, आता केंद्र सरकारनं ही सुविधा स्थगित केली आहे.
पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर याविषयी माहिती देताना ठळक अक्षरात लिहिलंय, "पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलं आहे. आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून लाभार्थ्यांच्या पडताळणीची पद्धत स्थगित करण्यात आली आहे.
"त्यामुळे शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून घ्यावे. ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 मे 2022 ही असेल."
आधार कार्ड बँक खात्याशी जोडून घ्या
पीएम किसान सन्मान निधीअंतर्गत आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
पण एप्रिल 2022 ते जुलै 2022 या कालावधीतील 2 हजारांचा हप्ता आणि यापुढील प्रत्येक हप्ता हा लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.
त्यामुळे जर तुमचं बँक खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला पुढच्या हप्त्याची रक्कम मिळवण्यास अडचण येऊ शकते.
महाराष्ट्राचे कृषी गणना उपायुक्त विनयकुमार आवटे यांनी जारी केलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण झालं आहे.
यापैकी 88 लाख 74 हजार 872 लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहेत. तर 17 लाख 78 हजार 283 लाभार्थ्यांनी त्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नाहीये.
त्यामुळे मग या योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते तपासून पाहावं. बँक खात्याशी आधार लिंक नसल्यास ते त्वरित करून घ्यावं, असं आवाहन विनयकुमार आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं आहे.
पीएम किसान योजना काय आहे?
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता, अशापद्धतीनं 3 हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
साधारणपणे, दरवर्षी एप्रिल महिन्यात पहिला, ऑगस्टमध्ये दुसरा तर डिसेंबरमध्ये तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो.
आतापर्यंत एकूण 10 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. तर अकरावा हप्ता 18 ते 24 एप्रिल दरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Subscribe by Email
Follow Updates Articles from This Blog via Email




No Comments